ती गेली तेव्हा…

FB_IMG_1526366563429-01ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती गेली तेव्हा रिमझिम ..पाऊस निनादत होता..

मेघात अडकली किरणे ..हा सूर्य सोडवीत होता..

ती आई होती म्हणुनी… घनव्याकुळ मीही रडलो ..

त्यावेळी वारा सावध ..पाचोळा उडवित होता ..

अंगणात गमले मजला ..संपले बालपण माझे.

खिडकीवर धुरकट तेव्हा ..कंदील एकटा होता …

(गाण्यात न घेतलेली दोन कडवी अशी आहेत)

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |

– कवी ग्रेस

हे गाणं कितिदाही ऐकलं तरी मन भरत नाही. कवी ग्रेस यांचा ओळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी चलबद्ध आणि गायील्या आहेत. या गाण्यात असं काही आहे की ते अजूनहि तितकच ताजेतवाने आणि ह्रदयला भिडणार आहे.

 

या गाण्याचे विश्लेषण करणारा एक सुंदर ब्लॉग वाचला. यात श्री संजय क्षीरसागर यांनी खूप छान अर्थ समजवून सांगितला आहे. तोच इथे कॉपी पेस्ट करत आहे.

या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची. त्यावेळी होत असलेली मनाची असह्य अवस्था ग्रेस या कवितेत अत्यंत कलात्मकरित्या मांडतो.

एक स्त्री की जी मैत्रिणीच्या वयाची, (त्यात) स्वत:चा प्रियकर असलेली आणि तरीही (स्वत:शी) आईचं नातं जडलेली!

अत्यंत जीवघेणी असह्यता, आणि तरीही सहज पार करता येईल असं दु:ख पण नात्याच्या मर्यादा, अशी बेहद्द गुंतागुंतीची स्थिती.

सामान्य व्यक्तीच्या जीवनात असं दु:ख असंभव, तरीही ‘दु:ख’ ही भावना सगळ्यांना समान (मग कारण काहीही असो). असाह्यता केवळ बेजोड, पण ‘आपल्यासाठी केवळ कल्पना’ म्हणून, (किमान संवेदनाशिल व्यक्ती) तरी ती बेदखल करु शकत नाही. आणि समजा कुणी केली, तर मग कविता कशी समजणार ?

तर असा हा अप्रतिम काव्यविषय आणि ग्रेससारख्या चिंतनशील, सौंदर्यवादी आणि प्रतिभावंत कवीची रचना, केवळ लाजवाब!
____________________________________

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

नादमय शब्दयोजना कशी असावी आणि तीही प्रचलित मराठीसारख्या (ज्ञानेश्वरांच्या नाही), नाद-दुर्लभ भाषेत, याचा प्रत्यय देणारं शब्दसंयोजन ‘पाऊस निनादत होता’ !
आणि त्यापूर्वी येणारा तो शब्द, ‘रिमझिम’ !
आणि तो शब्द जिच्याशी जोडलायं ती कमालीची लक्षवेधी ओळ ‘ती गेली तेव्हा’ !

पहिल्या ओळीतच नादमय शब्दसंयोजन, लयीचा अत्यंत नाजूक हेलकावा आणि सर्वांचा मिळून एक चित्रदर्शी परिणाम :

‘ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता’!

रसिकमनाला खेचून घेईल अशी सुरुवात.

आणि लगेच तिच्या (ओलसर) केशकुंतलांची मेघांशी केलेली रुपकात्मक सरमिसळ! जस्ट मॅडनेस!

‘मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता’

त्यावर कहर म्हणजे (ती प्रियकराकडे निघाल्यानं) स्वत:च्या मनाची झालेली गुंतागुंत सोडवायचा अत्यंत लाघवी प्रयत्न… ‘हा सूर्य सोडवित होता’ !

काय कमाल प्रतिभा आहे या माणसाची, निव्वळ थक्क होऊन जावं!

______________________________________________

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

मग पुन्हा मनाचा कोंडमारा आणि काय लाजवाब अभिव्यक्ती, ‘ घनव्याकुळ मीही रडलो’. कसे सुचत असावेत शब्द या प्रतिभावंताला? ‘घनव्याकुळ’.
स्वत:चा शब्द तरीही अर्थाशी ईमान, काव्यविषयाशी एकसंधता आणि पावसाच्या माहौलशी एकरुपता!

एका शब्दात सगळा परिणाम एकवटण्याची किमया, रसिकाला स्वत:च्या प्रगल्भ अनुभवाच्या खोलीशी नेण्याची ताकत.

आणि दुसर्‍या ओळीत सामाजिक उपहासाचं किती नाजूक भान,

‘त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता’

कवीच्या दु:खाशी जे समरुप होऊ शकत नाहीत अशा सावध (खरं तर असंवेदनाशील) लोकांना, असे विचार म्हणजे केवळ पाचोळा!

______________________________________

पुन्हा एकवार तीच जीवाची घालमेल, पण मांडणीची बेतहाशा नज़ाकत :

‘अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे’
आता ती आई राहिली नाही त्यामुळे बालपण संपलं. घरापासून अंगण दूर झालं!

‘खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता’

आता या आयुष्याच्या बद्ध चौकटीत (मिणमिणत्या) कंदीलासारखी एकाकी अवस्था!

__________________________________

स्वत:च्या आणि आईच्या वयातलं अंतर, मोहाचा भुलावा आणि नात्याचा तोल, ग्रेस काय बहारीनं जपतोयं. एकदा असं ही वाटून गेलं की बंध पार करावा :

‘तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती’

…. पण अचानक :

‘शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’

नातं ही केवळ मान्यता आहे हे कुणाही प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तीला कळतं, पण तो अर्थबोध जरी शब्दातून वगळला तरी उरलेल्या शब्दातून पुन्हा अर्थ उगवतोच!

शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’

काय कमालीची संयत मांडणी आहे.
____________________________

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही

आता मी असाच मोठा होईन आणि कोरडाच वाढत राहीन. आईपासून (त्या गहिर्‍या नात्यापासून) तुटण्याचं दु:ख आता असं काही गोठलंय की पुन्हा गहिंवर यावा असं काही घडणार नाही.

काय कमालीचं वर्णन आहे व्याकुळतेचं ‘मज आता गहिंवर नाही’

आणि शेवटच्या ओळी तर काय कहर आहेत!

‘वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता’

म्हणजे ज्या आईची सामाजानं अवहेलना करु नये, तिची लज्जा झाकली जावी म्हणून मी कृष्ण झालो, तिला सर्वतोपरी झाकायचा प्रयत्न केला (ते नातं सावरतांना आता अशी काही असहायता आलीये की) मीच… सर्वस्वी निर्वस्त्र झालो.

https://www.misalpav.com/node/29066

Author: भटका_जीव_सदाशिव

Civil servant, history heritage lover, Traveler, photography enthusiast, doctor-village boy, $piritual humanism, Garvi Gujarati

One thought on “ती गेली तेव्हा…”

Leave a comment